CORONAVIRUS : लातूरकरांच्या चिंतेत भर, जून महिना ठरला दुप्पट रुग्णवाढीचा

corona image.jpg
corona image.jpg

लातूर : कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली मंदावल्या असल्याने आणि नागरिकांमधील निष्काळजीपणा वाढला. कोरोनाबाधितांची संख्या लातूरात चांगलीच वाढली आहे. मे महिन्यात १२० रूग्णांची भर पडली होती. तर मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये ही रूग्णवाढ जवळजवळ दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे. ही वाढती रूग्णसंख्या लातूरकरांसाठी आता चिंतेचा विषय ठरत आहे.

लातूर शहर आणि जिल्ह्यातील रूग्णसंख्या एप्रिल महिन्यापर्यंत आटोक्यात होती. एप्रिल अखेरीस जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात केवळ १६ रुग्ण उपचार घेत होते. त्यामुळे लातूर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा निर्माण झाली होती. पण, याचदरम्यान टाळेबंदी मागे घेण्यात आली. उद्योग-व्यवसायाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडू लागले. सुरूवातीला फिजिकल डिस्टंन्स राखणे, मास्क लावणे या नियमांचे पालन होत होते. पण, हळूहळू या नियमांचे विस्मरण नागरिकांना होऊ लागले आहे. अशांवरील कारवाईसुद्धा थंडावली. या सर्व बाबीचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यावर होत आहे.

मे महिन्यात १२० रूग्ण लातूर शहरात आणि जिल्ह्यात आढळून आले होते. त्यानंतर आता जून महिन्यात तब्बल २१८ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जून महिन्यात सर्वाधिक रूग्ण महिन्याच्या अखेरिस निदर्शनास आले आहेत. मे महिन्याच्या अखेरीससुद्धा रुग्णसंख्या वाढलेली होती. यातील काही रूग्ण परजिल्ह्यात आणि परराज्यात प्रवास करून लातूरात परतलेले आहेत. तर काही रूग्णांना प्रवासाशिवाय कोरोनाची लागण झाली आहे. ती नेमकी कशी झाली, याचे उत्तर बऱ्याच कोरोनाबाधित रुग्णांकडे नाही. त्यामुळे नागरिकांना अधिक सर्तक राहणे गरजेचे बनले आहे.

जिल्ह्यात १२५ कंटेनमेंट झोन
लातूर शहर आणि जिल्ह्यात आजवर १२५ कंटेनमेंट झोन तयार झाले. यातील ५९ झोन आजवर बंद झाले आहेत तर ६६ झोन अद्याप सुरू आहेत. यातील लातूर शहरात तब्बल ३४ झोन सध्या सुरू आहेत तर १५ झोन बंद झाले आहेत. लातूर ग्रामीणमध्ये २ झोन सुरू आहेत तर ७ झोन आजवर बंद झाले आहेत. उदगीर तालूक्यात सध्या १३ झोन कार्यरत आहेत तर २० झोन आजवर बंद झाले आहेत. औसा तालूक्यात १० झोन, निलंगा तालूक्यात ४, अहमदपूर तालूक्यात २, जळकोट तालूक्यात १ झोन सध्या सुरू आहे.

हे आहेत शहरातील कंटेनमेंट झोन
शहावली मोहल्ला, भूसार लाईन, चौधरी नगर, मोती नगर, सरस्वती कॉलनी, जुनी कापड लाईन, भोई गल्ली, सुतमील रस्ता, माताजी नगर, कैलास नगर, अजिंक्य सिटी, श्याम नगर, गवळी गल्ली, चंद्रोदय कॉलनी, कुरेशी गल्ली, विठ्ठल नगर, गणेश नगर, वाल्मिकी नगर, आझाद चौक, न्यू भाग्य नगर, कुलस्वामिनी नगर, मजगे नगर, नारायण नगर, भीम नगर, सुळे गल्ली, शिवनगर, झिंगनप्पा गल्ली, क्वाईल नगर, खंडोबा गल्ली, गिरवलकर नगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com